धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीत शेतकरी बांधवांचे पशुधन वाचविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले जात आहेत. चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी बांधवांवर आपल्या बैलजोड्या विकण्याची दुर्दैवी वेळ येऊ नये, यासाठी धाराशिव शहरानजीक शेकापूर साठवण तलाव परिसरात तब्बल पाच हजार बैलांसाठी विशेष छावणी उभारली जाणार आहे. जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
यंदा जिल्ह्यात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शेती आणि शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पावसाअभावी खरीप हंगामाला मोठा फटका बसला असून, अनेक भागांत शेतीची कामे ठप्प झाली आहेत. परिणामी शेतातील कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या बैलजोड्याही सध्या रिकाम्या आहेत. मात्र, त्यांचा चारा, पाणी आणि देखभालीचा खर्च शेतकरी बांधवांना परवडेनासा झाला आहे. एकीकडे आर्थिक संकट आणि दुसरीकडे पशुधनाच्या संगोपनाचा खर्च अशा दुहेरी संकटात शेतकरी वर्ग सापडला आहे. विशेषतः अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांसमोर बैलजोड्या सांभाळण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत त्यांचा सांभाळ कसा करायचा, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. चारा आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसल्याने अनेक शेतकऱ्यांवर नाइलाजाने आपल्या बैलजोड्या विक्रीस काढण्याची दुर्दैवी वेळ येऊ शकते. मात्र, एकदा बैलजोड्या विकल्या गेल्यानंतर आगामी हंगामात शेतीच्या कामांसाठी पुन्हा जनावरे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. ही बाब ध्यानात घेऊन बैलजोड्यांचे संरक्षण करण्यासाठी विशेष छावणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
शहरानजीक शेकापूर साठवण तलाव परिसराची निवड
धाराशिव शहरानजीक असलेल्या शेकापूर साठवण तलाव परिसरात उपलब्ध जलसाठा आणि जागेचा विचार करून छावणी उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तलावाच्या जवळच छावणी असल्याने बैलांसाठी पाण्याची उपलब्धता सुलभ होणार आहे. तसेच पाणी वाहून आणण्यासाठी लागणारा खर्च आणि मनुष्यबळाची बचत होण्यास मदत होणार आहे. चारा, पाणी आणि पशुवैद्यकीय सुविधांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे. पाण्याचा अपव्ययही टाळता येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
