धाराशिव (प्रतिनिधी)- मंत्रालयीन शिक्षण विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून वसतिगृह तपासणीच्या नावाखाली शासकीय यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या श्रीकांत डोईफोडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 204 आणि 205 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्रशासनाने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने आपण मंत्रालयीन स्तरावरील शिक्षण विभागातील अधिकारी असल्याचे भासवून वसतिगृह तपासणीसाठी आल्याचे सांगितले. या माध्यमातून त्याने प्रशासकीय यंत्रणेवर प्रभाव निर्माण केला. तसेच तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात निवासाची व्यवस्था, तुळजाभवानी देवीच्या दर्शनाची सोय आणि अन्य प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या ओळखीबाबत संशय निर्माण झाल्यानंतर प्रशासनाकडून पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तो मंत्रालयीन स्तरावरील शिक्षण विभागाचा अधिकारी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिनकर अंबादास होळकर यांनी पुढाकार घेत संबंधित व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली. शासकीय अधिकारी असल्याचे खोटे भासवून प्रशासनाची दिशाभूल करण्याच्या प्रकाराची जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतल्याने अशा प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
