धाराशिव (प्रतिनिधी)- खरीप 2020 मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाच्या पीकविम्यापोटी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुमारे 226 कोटी रुपयांच्या भरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातील ताज्या घडामोडीत शेतकऱ्यांची बाजू मान्य झाली असून, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या दीर्घ न्यायालयीन लढ्याला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. ही माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काढणीनंतर शेतात ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी पावसात भिजल्याने दाण्यांना मोड आले, तर अनेक ठिकाणी सोयाबीन सडून गेले. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या परिस्थितीत पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळणे अपेक्षित असताना, नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत दिली नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करून अनेक शेतकऱ्यांचे विमा दावे नाकारण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हा विषय सातत्याने लावून धरला आणि न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून पाठपुरावा केला.
या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने शेतकऱ्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. या निर्णयाला विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, तेथेही कंपनीला दिलासा मिळाला नाही. त्यानंतर उर्वरित भरपाई मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला आता महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयातील ताज्या घडामोडींमुळे सुमारे 226 कोटी रुपयांची भरपाई पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.
