उमरगा (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाधी निर्मिती करून, संपूर्ण जगाला लोकशाहीची प्रेरणा देणारे, शिका, संघटीत व्हा व आपल्या हक्कासाठी संघर्ष करा असा भारतीयांना महामंत्र देणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच जागतीक किर्तीचे विश्वगुरु आहेत. असे विचार भारतीय संरक्षण खात्यातील निवृत्त वरिष्ट अधिकारी गोंविदराव कांबळे सांगवीकर यांनी व्यक्त केले.
उमरगा येथील बहुजन हिताय वसतीगृहात 76 वा संविधान दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री कांबळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम संस्थेचे अधिकारी प्रा सुमित कोथिंबीरे हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून वसतीगृहाचे अधिक्षक प्रज्ञाजीत हे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना कांबळे पुढे म्हणाले डॉ आंबेडकरांनी संविधान च्या माध्यमातून देशातील दलित, पिढीत , महिला व वंचीत घटकातील नागरीकांना सन्मानाने जगण्याचा महामंत्र दिला. जागतीक स्तरातील शिक्षण क्षेत्रात सर्वात जास्त पदव्या मिळणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव विद्यार्थी आहेत.
आपल्या भारतीय संविधानाची जगातील अनेक देशांनी प्रेरणा घेऊन आपल्या देशाची राज्यघटना बनवली आहे म्हणून युनो सारख्या जागतीक संघटनेच्या मुख्य कार्यालयात दरवर्षी फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचीच जयंती साजरी केली जाते म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच विश्वगुरू आहेत असे विचार त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. यावेळी श्री प्रज्ञाजीत व प्रा कोथिंबीरे यांनी संविधानाचा गौरव करून, युवकांनी डॉ आंबेडकरांचा आदर्श घेवून आपल्या जिवनाची वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले. यावेळी वसतीगृतातील बाल विद्यार्थी संघर्ष गायकवाड यांनी संविधानावर आपले विचार व्यक्त करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे व संविधान उद्दीशिकेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थी भागवत माशाळे यांनी केले व आभार प्रदर्शन विद्यार्थी संघपाल लोंढे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, कर्मचारी व गावातील प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
