भूम (प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असून, जनावरांना चारा आणि पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे. पशुखाद्याचे वाढते दर, चाऱ्याची कमतरता आणि पाण्याचे संकट यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर पशुधन जगवण्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांची आणखी किती परीक्षा पाहणार, असा संतप्त सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे यांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांकडे असलेल्या जनावरांना जगवण्यासाठी आवश्यक चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याऐवजी नवीन नवीन योजनांच्या घोषणा करण्यात येत आहेत. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने या घोषणांचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन योजना जाहीर करण्यापूर्वी सध्या शेतकऱ्यांकडे असलेल्या पशुधनाला जगवण्याचे नियोजन सरकारने करावे, अशी मागणी आडागळे यांनी केली आहे.
योजनांच्या जाहिराती नकोत, प्रत्यक्ष मदत हवी!
शेतकऱ्यांना सध्या योजनांच्या जाहिराती किंवा आश्वासनांची गरज नसून, त्यांच्या जनावरांसाठी चारा, पाणी आणि पशुखाद्याची प्रत्यक्ष व्यवस्था हवी आहे. सरकारने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, चारा अनुदान उपलब्ध करून द्यावे आणि पशुखाद्याचा पुरवठा सुरळीत करावा. पशुधन उपासमारीच्या संकटात असताना प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
घोषणांचा पाऊस, अंमलबजावणी मात्र कुठे?
सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असून, प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या बाबतीत शेतकरी व नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप प्रल्हाद आडागळे यांनी केला. शेतकरी आणि सामान्य नागरिकांना विविध ऑनलाइन प्रक्रिया, सरोवर पोर्टल तसेच ओटीपीच्या अडचणींमध्ये गुंतवून ठेवण्यापेक्षा त्यांच्या मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
“धन्याच्या हातात धतूरा आणि चोराच्या हातात मलिदा,” अशी परिस्थिती सरकारने निर्माण केली असल्याची टीका करत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
पशुधन वाचवा, ग्रामीण अर्थव्यवस्था टिकवा!
शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. शेतकरी जगला तरच पशुधन जगेल आणि पशुधन जगले तरच ग्रामीण अर्थव्यवस्था टिकून राहील. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाने तातडीने जागे होऊन चारा-पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रल्हाद आडागळे यांनी दिला.
