परंडा (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परंडा येथील तीन प्राध्यापकांनी विविध विषयांवर पुस्तके प्रकाशित करून शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्राध्यापक डॉ.शहाजी चंदनशिवे, डॉ.अतुल हुंबे आणि डॉ.राहुल देशमुख यांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांचे प्रकाशन श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव या संस्थेचे सचिव संजय बप्पा निंबाळकर, अध्यक्ष सुनील नाना शिंदे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ. किरण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये प्रोफेसर डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी बी.एस्सी. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 'Pet Animal Care and Management” हे महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशित केले आहे. पाळीव प्राण्यांचे संगोपन, आरोग्य व्यवस्थापन, आहार, काळजी आणि व्यवस्थापन या विषयांच्या अभ्यासासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. प्राणीशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना तसेच पाळीव प्राण्यांच्या संगोपनात रुची असणाऱ्यांना या पुस्तकाचा लाभ होईल.प्रोफेसर डॉ.अतुल हुंबे यांनी 'Avian Biology' हे पुस्तक प्रकाशित केले असून जीवशास्त्र विषयाच्या अध्ययनासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. तसेच ग्रंथपाल डॉ.राहुल देशमुख यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर ग्रंथालय क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अधोरेखित करणारे 'AI in Library Services' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ग्रंथालय सेवा अधिक आधुनिक, गतिमान आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाचे महत्त्व आहे. याप्रसंगी संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी तिन्ही प्राध्यापकांचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. शिक्षकांनी केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता संशोधन, लेखन, पुस्तक प्रकाशन आणि ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रातही योगदान द्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तिन्ही प्राध्यापकांनी आपल्या विषयातील ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेला हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगून त्यांनी भविष्यातही अधिकाधिक पुस्तके प्रकाशित करावीत, संशोधन कार्यात प्रगती करावी आणि शैक्षणिक क्षेत्रात महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा अशा शुभेच्छा दिल्या.
