कळंब (प्रतिनिधी)- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे दैनंदिन अध्यापन प्रभावित करणाऱ्या ऑनलाईन कामांच्या अतिरेकामुळे मुख्याध्यापक-शिक्षक त्रस्त आहेत. संचमान्यता धोरणाचे दुष्परिणाम, टीईटी संबंधाने शासनाची नकारार्थी भूमिका यासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे अस्तित्व संपवणारे धोरण, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शाळांच्या अडचणी यासह शिक्षकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पुणे येथे सर्व शिक्षक संघटनेच्या झालेल्या बैठकीत अनावश्यक ऑनलाईन कामावर बहिष्कार व प्रशासकीय व्हाट्सअप ग्रुप मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.
या बैठकीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संभाजीराव थोरात, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्राचे पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, स्वतंत्र समता शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक महासंघ, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, प्रहार शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी व अधिकारी संघटना व या संघटनांचे राज्य पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. सातत्यपूर्ण लढा देण्यासाठी पुढील काळात कृती कार्यक्रम आखून चळवळ बळकट करण्याचे ठरविण्यात आले. शिक्षकांना शिकवू द्या..! विद्यार्थ्यांना शिकू द्या...!! या मागणीला प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले. पुढील काळात विविध शिक्षक संघटना, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, पालक संघटना, लोकप्रतिनिधींसह समन्वय साधून लढ्याची पुढील दिशा निश्चित करण्याचे ठरवण्यात आले.
