धाराशिव (प्रतिनिधी)- उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, तसेच समान कामासाठी समान वेतन या तत्त्वानुसार न्याय्य वेतनवाढ द्यावी, या मागणीसाठी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक 17 नोव्हेंबर 2026 पासून सुरू करण्यात आलेल्या बेमुदत संपाला धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर पाठिंबा दिला आहे.
यासंदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश इंद्रसिंह राजे निंबाळकर यांनी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेला पाठिंब्याचे पत्र दिले. दुय्यम न्यायालयातील कर्मचारी न्यायव्यवस्थेच्या कामकाजात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असून, उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करणे आवश्यक आहे. या मागणीवर शासन स्तरावर होत असलेली दिरंगाई दूर करून शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेस कमिटीने केली आहे.
कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात धाराशिव जिल्हा काँग्रेस पार्टी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला काँग्रेसचा नैतिक व संघटनात्मक पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका उमेश राजे निंबाळकर यांनी व्यक्त केली.
