धाराशिव (प्रतिनिधी)- शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासह शहरातील कचरा डेपो शहराबाहेर हलविणे, नियमित स्वच्छता, तुंबलेल्या गटारी व नाल्यांची स्वच्छता तसेच इतर नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 17 नोव्हेंबरपासून तीन दिवसीय स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गणेश नगर परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी नागरिकांनी स्वाक्षरी करण्यासोबतच शहरातील विविध समस्याही पोस्टरवर लिहून मांडल्या. यामधून नागरिकांचा प्रशासनाविषयीचा असंतोष स्पष्टपणे व्यक्त झाला.

शहरातील नागरिकांनी आम्ही नियमितपणे कर भरतो, त्यामुळे आम्हाला स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा मिळणे ही नगरपरिषद प्रशासनाची तसेच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि कर्तव्य आहे, अशी भावना व्यक्त केली. केवळ कर वसूल न करता नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

या स्वाक्षरी मोहिमेला ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत आपल्या परिसरातील समस्या मांडत मोहिमेत सहभाग नोंदविला.

धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्यासह प्रशांत पाटील, धनंजय राऊत, खलील सय्यद, अग्निवेश शिंदे, अभिमान पेठे, अंकुश पेठे, अजहर पठाण, गोरोबा झेंडे, प्रभाकर लोंढे,अशोक बनसोडे, जयसिंग पवार, ॲड. गणपत कांबळे, हरिदास शिंदे, ॲड. राजूदास आडे, अविनाश रणखांब, पोपट शिंदे, आरिफ मुलानी, बाबा मोमीन, मोइब शेख, दयानंद नागापुरे, सय्यद मन्सूर, महावीर चव्हाण आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील स्वच्छता आणि मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांवर नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम पुढील दोन दिवसही शहरातील विविध भागांत राबविण्यात येणार आहे.


 
Top