धाराशिव (प्रतिनिधी)- आज दिनांक 16-11-2026 रोजी येरमाळा ते येडशी जाणाऱ्या मार्गावर भारत पेट्रोल पंपासमोर नियमित फ्लाइंग ड्युटी व गस्त करत असताना, वायूवेग पथकास एक दुचाकी अपघात झाल्याचे व अपघातग्रस्त व्यक्ती जखमी अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पथकाने तात्काळ रुग्णवाहिका बोलावली. अपघातग्रस्तास आवश्यक ती मदत करून रुग्णवाहिकेत सुरक्षितपणे दाखल करण्यात आले.
दरम्यान, येडशी टोल नाक्यावर सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे रुग्णवाहिकेच्या मार्गात अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. अपघातग्रस्तासाठी गोल्डन अवरचे महत्त्व लक्षात घेऊन पथकाने आपल्या RTO वाहनाद्वारे रुग्णवाहिकेस पायलटिंग केले. आंदोलनाच्या ठिकाणाहून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देत रुग्णवाहिकेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), धाराशिव येथे सुरक्षितपणे पोहोचण्यास मोलाची मदत केली.
सदर कार्यवाही मो. वा. नि. सुनील शिंदे, स. मो. वा. नि. मेहबूब सय्यद व वाहनचालक गोरख बोधले यांनी अत्यंत तत्परतेने पार पाडली.
नियमित शासकीय कर्तव्य बजावत असताना अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणे, वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आणि रास्ता रोको आंदोलनासारख्या प्रतिकूल परिस्थितीतही रुग्णवाहिकेला सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे, यातून वायूवेग पथकाने केवळ आपले शासकीय कर्तव्यच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी व मानवी जीवनाप्रती असलेली जबाबदारीदेखील समर्थपणे निभावली.
कर्तव्य बजावताना माणुसकी जपण्याचे आणि प्रसंगावधान राखून मानवी जीवनाला प्राधान्य देण्याचे उत्कृष्ट उदाहरण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिवच्या वायूवेग पथकाने घालून दिले.
