धाराशिव (प्रतिनिधी)-  युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ मिळावे,त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी आणि भारतीय लोककला व संस्कृतीचा समृद्ध वारसा नव्या पिढीने जपावा,या उद्देशाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवात धाराशिवच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या युवक- युवतींनी लोकनृत्य आणि लोकगीत या दोन्ही कलाप्रकारांत प्रथम क्रमांक पटकावत आपली छाप उमटविली.

‌‘नशामुक्त युवा  विकसित भारतासाठी' या संकल्पनेवर आधारित विकसित भारत नेतृत्व संवाद 2027 अंतर्गत जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2026-27 चे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने 27 नोव्हेंबर रोजी धाराशिव येथील पुष्पक मंगल कार्यालयात करण्यात आले.

महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत,पथनाट्य,चित्रकला आणि कविता लेखन या विविध कलाप्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.लोकनृत्य आणि लोकगीत या दोन्ही स्पर्धांमध्ये धाराशिवच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या युवक-युवतींनी प्रथम क्रमांक मिळविला. पथनाट्य स्पर्धेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपपरिसरातील संघाने प्रथम क्रमांक पटकावला.चित्रकला स्पर्धेत गुरू रवि देशमुख,तर कविता लेखन स्पर्धेत वैष्णवी आदमीले यांनी प्रथम क्रमांक मिळविला.या सर्व विजेत्यांनी नांदेड येथे होणाऱ्या विभागस्तरीय युवा महोत्सवात प्रवेश मिळविला आहे. महोत्सवातील विजेत्या स्पर्धकांना जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. 


 
Top