धाराशिव (प्रतिनिधी)-  आपल्या कष्टातून साखरेला गोडवा देणाऱ्या ऊसतोड कामगारांचे जीवन अनेक अडचणींनी व्यापलेले असते.पोटाची खळगी भरण्यासाठी गाव-घर सोडून ऊसतोडीसाठी जाणाऱ्या या कामगारांच्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो.अशा कठीण प्रसंगी ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना राज्य शासनाच्या अर्थसहाय्याचा मोलाचा आधार मिळत आहे. 

जिल्ह्यात आजतागायत 13 मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांप्रमाणे एकूण 65 लाख रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे.ऊसतोड कामगारांना कामाच्या ठिकाणी विविध संकटांना सामोरे जावे लागते.अपघाती मृत्यू,अपंगत्व,वैद्यकीय उपचारांचा खर्च,आगीमुळे झोपडी व साहित्याचे होणारे नुकसान, तसेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या बैलजोडीचा मृत्यू अथवा अपंगत्व यामुळे कामगारांच्या कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होतात.अशा परिस्थितीत या कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध बाबींसाठी सानुग्रह अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.


विविध संकटांसाठी सानुग्रह अनुदान

ऊसतोड कामगारांच्या झोपडीला आग लागून झोपडी व साहित्याचे नुकसान झाल्यास 10 हजार रुपये, वैयक्तिक अपघातात मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये, अपघातामुळे अपंगत्व आल्यास दोन लाख 50 हजार रुपये,वैयक्तिक अपघातातील वैद्यकीय खर्चासाठी 50 हजार रुपये,लहान बैलजोडीचा मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास 75 हजार रुपये,तर मोठ्या बैलजोडीचा मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास एक लाख रुपये सानुग्रह अनुदान स्वरूपात अर्थसहाय्य देण्यात येते.


 
Top