धाराशिव (प्रतिनिधी)- मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवणाऱ्या आजच्या पिढीने मैदानाशी मैत्री केली, तर आरोग्याच्या अनेक समस्या आपोआप दूर होतील. खेळ हा केवळ मनोरंजनाचा किंवा पदक जिंकण्याचा मार्ग नसून निरोगी आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली आहे. मैदानावर घाम गाळणारा खेळाडू केवळ शरीरानेच नव्हे, तर मनानेही सक्षम बनतो. खेळातून मिळणारा फिटनेस ही आयुष्यभराची शिदोरी ठरते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात खेळाला महत्त्वाचे स्थान द्यावे, असे प्रतिपादन आमदार कैलास पाटील यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने आयोजित लातूर विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, प्राचार्य डॉ. दयानंद जटनूरे, आर्चरी राज्य मार्गदर्शक शुभांगी रोकडे, राज्य तांत्रिक समिती प्रमुख अशोक जंगमे, धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, कोषाध्यक्ष गुलचंद व्यवहारे, सहसचिव अभय वाघोलीकर, सदस्य सुधीर बंडगर, नांदेड जिल्हा सचिव वृषाली जोगदंड, विक्रम पाटील, प्रशिक्षक कैलास वाटेफळकर आणि ओम राठोड आदी मान्यवरांसह विविध जिल्ह्यांतील प्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, खेळामुळे केवळ शारीरिक क्षमता विकसित होत नाही, तर शिस्त, एकाग्रता, आत्मविश्वास, संयम आणि खिलाडूवृत्ती यांसारखे जीवनोपयोगी गुणही अंगीकारता येतात. विशेषतः धनुर्विद्या या खेळात एकाग्रता, मानसिक स्थैर्य आणि अचूकतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्यावर बाण साधताना खेळाडूला स्वतःच्या मनावर आणि शरीरावर नियंत्रण ठेवावे लागते. हीच एकाग्रता जीवनातील ध्येय गाठण्यासाठी उपयुक्त ठरते. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्येही मोठी गुणवत्ता असून त्यांना योग्य संधी, मार्गदर्शन आणि सुविधा मिळाल्यास ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चितच चमकू शकतात. या विभागीय स्पर्धेत धाराशिव, लातूर शहर व ग्रामीण तसेच नांदेड शहर व ग्रामीण अशा विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे वाशिम येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी लातूर विभागाचा संघ निवडण्यात येणार आहे.
