मुरूम (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील कंटेकूर येथील दोन तरुणांनी वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण करून गावाचे पहिले डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल तसेच एका विद्यार्थ्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याबद्दल रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने कंटेकूर येथे विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कंटेकूर येथील डॉ. गीतांजली चंद्रकांत गावडे यांनी मुंबई येथील नामांकित के.ई.एम. रुग्णालयातून बालरोगतज्ज्ञ ही पदव्युत्तर पदवी संपादन केली. तर, डॉ. सुजित हनुमंत कुंभार यांनी एम.बी.बी.एस. पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली. हे दोघेही कंटेकूर गावातील पहिले डॉक्टर ठरल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निमित्ताने रोटरी अध्यक्ष कल्लय्या स्वामी, सचिव प्रकाश रोडगे, सरपंच विजयाबाई जमादार, माजी अध्यक्ष गोविंद पाटील, प्राचार्य उल्हास घुरघुरे, उपमुख्याध्यापक संतोष कांबळे, महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष माधवराव पाटील, विश्वनाथ बिराजदार, चंद्रकांत कुलकर्णी, राम मुडगे, मल्लिकार्जुन बदोले, माजी विस्तार अधिकारी चंद्रकांत गावडे आदींच्या हस्ते डॉ. गीतांजली गावडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करत हार्दिक अभिनंदन करण्यात आले. डॉ. सुजित कुंभार हे पदव्युत्तर प्रवेश मिळाल्याबद्दल रोटरीच्या वतीने त्यांचेही विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच, गावातील गुणवंत विद्यार्थी सुरज व्यंकट जमादार याची छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल सुरज जमादार याचा त्याच्या माता-पित्यासह रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने सत्कार करून भावी वैद्यकीय शिक्षणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार यावेळी रोटरीचे कल्लय्या स्वामी, गोविंद पाटील यांनी काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्हास घुरघुरे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार प्रकाश रोडगे यांनी मानले. या कार्यक्रमास रोटरीचे पदाधिकारी, सदस्य तसेच कंटेकूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top