धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 वरील नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याच्या भूसंपादन प्रकरणावरून शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानुसार प्रसिद्ध करण्यात आलेली 3-अ अधिसूचना संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक व्यपगत करण्यात आल्याचा गंभीर आरोप समितीने केला आहे. या प्रकरणात उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने समन्वयक दिलीप जोशी, जिल्हाध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, तुळजापूर तालुकाध्यक्ष व्यंकट पाटील यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, धाराशिव यांना निवेदन सादर केले आहे.