धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील वाशी, अणदूर, शिराढोण आणि कळंब येथील एसटी बसस्थानकांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून एकूण 13 कोटी 91 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाशी बसस्थानक 3 कोटी 66 लाख रुपये, अणदूर बसस्थानक 1 कोटी 8 लाख रुपये, शिराढोण बसस्थानक 4 कोटी 45 लाख रुपये, कळंब बसस्थानक 4 कोटी 72 लाख रुपये असा एकूण मंजूर निधी 13 कोटी 91 लाख रुपयाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
या कामांमुळे बसस्थानक परिसरातील खड्डे, चिखल तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. परिणामी एसटी बसची वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून प्रवासी, एसटी कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. सदर विकासकामे लवकरात लवकर सुरू होऊन दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असेही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
