धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील चार गावांतील शेतकऱ्यांचा शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या उसाची शनिवारी (ता. 31) धाराशिव जिल्हा शेतकरी संघर्ष समितीचे संयोजक संजय पाटील दुधगावकर यांनी पाहणी केली.

यंदाची दुष्काळी स्थितीमुळे खरीप पिकं पावसाअभावी गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आहे तेवढ्या पाण्यावर पोसलेला आणि ऊसतोड येईपर्यंत जोपासलेला ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. कळंब तालुक्यातील अंबा सौंदना येथील ऋषीकेश धनराज पालकर, माणिक धोंडिबा पालकर, श्रीमंत विनायक पालकर, नवनाथ मोकिंदा पालकर, अंबादास रामा गिरी, दत्ता लिंबराज गिरी, बापू लाला गिरी, प्रभावती खंडू पालकर, निलावती मुरलीधर मोरे, आशाबाई शेषेराव दिगे, अनंत भागवत डिगे, मुरलीधर मोकिंदा गाडेकर, दत्ता केशव गाडेकर, तुकाराम अंबादास गाडेकर आणि महादेव अंबादास गाडेकर या शेतकऱ्यांचा जवळपास 25 एकर ऊस जळाला आहे.

तसेच तालुक्यातील दाभा येथील दादासाहेब टिळे यांचा दीड एकर,करंजकल्ला येथील जगदीश पवार यांचा साडेतीन एकर, राजाभाऊ पवार यांचा दोन एकर, खंडू भाऊराव पवार यांचा साडेतीन एकर, तर लोहटा (पू.) येथील अरविंद मारुती देशपांडे यांचा पाच एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला आहे. अशा प्रकारे चार गावांतील शेतकऱ्यांचे मिळून 40 एकरांहून अधिक ऊस क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. शेतातील डीपीत शॉर्टसर्किट होऊन पडलेल्या जाळाने बांधावरील वाळलेल्या गवताने आग पकडल्याने शेजारील उसाच्या फडाला आग लागून मोठे नुकसान होत असल्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय पाटील दुधगावकर यांनी चार गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जळालेल्या ऊसाच्या फडाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती घेतली.

एकीकडे यंदाची दुष्काळी स्थिती आणि दुसरीकडे शॉर्टसर्किटमुळे जळणारा ऊस यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जळालेल्या उसाचे वजन आणखी घटूनये यासाठी कारखान्यानी तात्काळ ऊस तोड देण्यासाठी आणि शासनाकडून नुकसान भरपाई मिळुन देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

 
Top