तुळजापूर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या नावाखाली प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 200 रुपये शुल्क वसूल केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ सुरवसे यांनी केला. तुळजापूर पंचायत समितीत अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबविण्याची मागणी केली.
या योजनेचा लाभ संपूर्ण जिल्ह्यातून केवळ 85 लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे जिल्हाभरातील हजारो शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. अर्ज भरणे आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली प्रत्येकाकडून 200 रुपये घेतले जात असल्याने या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
85 लाभार्थ्यांसाठी हजारोंकडून शुल्क कशाला?
योजनेचा लाभ मर्यादित शेतकऱ्यांना मिळणार असेल, तर निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून शुल्क आकारणे योग्य ठरले असते. मात्र, सरसकट हजारो शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करण्याची गरज काय, असा सवाल सुरवसे यांनी उपस्थित केला. जिल्हाभरातून हजारो अर्जदारांकडून प्रत्येकी 200 रुपये जमा होत असल्याने लाखो रुपयांची वसुली होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
