धाराशिव (प्रतिनिधी)- मायक्रो फायनान्स कंपन्या व खासगी वित्तीय संस्थां मनमानी कर्ज वसुली करत आहेत. यावर कोणाचं नियंत्रण नसल्याने यासाठी लेखी आदेश किंवा शासन निर्णय काढल्यास त्यामुळं याच्यावर दबाव येईल. यासाठी असा शासन निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला व सर्वसामान्य नागरिकांची मायक्रो फायनान्स कंपन्या, खासगी वित्तीय संस्था, खासगी बँका व इतर कर्जपुरवठादारांकडून होणाऱ्या बेकायदेशीर कर्जवसुलीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने तातडीने ठोस शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्या व खासगी वित्तीय संस्थांच्या वसुली प्रतिनिधींकडून कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी कर्जदारांना वारंवार फोन करणे, त्यांच्या घरी जाऊन तगादा लावणे, धमकावणे, अपमानास्पद वागणूक देणे, कुटुंबीयांसमोर बदनामी करणे तसेच मानसिक दबाव निर्माण करणे, अशा प्रकारांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. विशेषतः महिला बचत गटातील सदस्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या प्रकारांचा गंभीर त्रास सहन करावा लागत आहे.
अधिकृत आदेश काढण्याची गरज
शासनाच्या वतीने वेळोवेळी पत्रकार परिषदांमधून खासगी वित्तीय संस्थांना तगादा लावून कर्जवसुली करू नये, अशा सूचना दिल्या जातात. मात्र, याबाबत स्पष्ट आणि ठोस शासन निर्णय अथवा बंधनकारक मार्गदर्शक सूचना नसल्यामुळे काही वित्तीय संस्था मनमानी पद्धतीने वसुली करीत आहेत. संबंधित वसुली प्रतिनिधींना जाब विचारल्यास ते शासनाचा अधिकृत निर्णय दाखविण्याची मागणी करतात. अशी माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली.
