धाराशिव (प्रतिनिधी)- शेतीसाठी घेतलेले कर्ज थकल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर नव्याने पीककर्ज मिळविण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.थकीत कर्जाच्या ओझ्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अशा शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत आता आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील एकवेळ समझोता (वन टाइम सेटलमेंट-ओटीएस) अंतर्गत राज्यातील 1 लाख 69 हजार 820 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी 20 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील 4 हजार 644 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची दोन लाख रुपयांवरील रक्कम संबंधित बँकेत भरून त्यानंतर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, जिल्ह्यात आतापर्यंत 68 हजार 353 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 664 कोटी 61 लाख रूपये जमा झाले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 83 हजार 931 पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या 68 हजार 353 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर राज्य शासनामार्फत 664 कोटी 61 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
आता दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.बँकांकडून प्राप्त माहितीवर संगणकीय प्रक्रिया करून 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 1 लाख 69 हजार 820 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी आधार प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीत जिल्ह्यातील 4 हजार 644 पात्र शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांची गावनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांवरील त्यांच्या हिश्श्याची रक्कम बँकेत भरल्यानंतर पुढील निकष व प्रक्रिया पूर्ण केल्यावर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. एकवेळ समझोता योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची यादी ग्रामपंचायत, बँक आणि विकास संस्थांमध्ये याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर शुक्रवारी बँकांकडून पोर्टलवर एकवेळ समझोता पात्र शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत होणार आहे.
रक्कम भरल्यानंतर तीन दिवसांनी आधार प्रमाणीकरणाची सुविधा
शेतकऱ्याने यादीत नमूद केलेली दोन लाख रुपयांवरील त्याच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत भरली असल्याची खात्री झाल्यानंतर आणि बँकेने पोर्टलवर थकबाकीची माहिती अद्ययावत केल्यानंतर तीन दिवसांनी संबंधित शेतकऱ्यास आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रथम बँकेत त्यांच्या हिश्श्याची रक्कम जमा करावी.त्यानंतर बँकेने पोर्टलवर माहिती अद्ययावत केल्याची खात्री करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी.
ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक
या योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण केली आहे, अशाच शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ॲग्रीस्टॅक नोंदणी,आधार प्रमाणीकरण आणि संबंधित बँकेत शेतकऱ्याच्या हिश्श्याची रक्कम भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या निकषांनुसार शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतचा कर्जमुक्तीचा लाभ संबंधित कर्जखात्यावर हस्तांतरित करण्यात येईल.शासनाच्या हिश्श्याची दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम संबंधित कर्जखात्यावर वर्ग झाल्यानंतर शेतकऱ्याची कर्जमुक्ती होणार आहे.
शेतकरी हिस्सा भरण्यासाठी 31 मार्च 2027 अंतिम मुदत
एकवेळ समझोता योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांवरील त्यांच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत भरण्यासाठी 31 मार्च 2027 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता प्रसिद्ध यादीतील आपले नाव आणि कर्जखात्याचा तपशील तपासून संबंधित बँकेशी संपर्क साधावा.बँकेकडून आवश्यक माहिती घेऊन आपल्या हिश्श्याची रक्कम भरावी आणि पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील टप्प्यांतही पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध होणार
एकवेळ समझोता योजनेंतर्गत 20 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेली यादी ही अंतिम किंवा एकमेव यादी नाही. बँकांकडून प्राप्त होणाऱ्या उर्वरित माहितीवर महा-आयटीमार्फत संगणकीय प्रक्रिया करण्यात येणार असून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या यापुढील टप्प्यांतही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.त्यामुळे पहिल्या यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनी योजनेच्या पुढील याद्यांची माहिती घ्यावी. पात्रतेनुसार पुढील याद्यांमध्येही शेतकऱ्यांचा समावेश होऊ शकणार आहे.
मयत,वृद्ध आणि बोटांचे ठसे न उमटणाऱ्या लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यप्रणाली
कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांपैकी काही शेतकरी मयत झालेले आहेत.तसेच काही वृद्ध शेतकऱ्यांचे व इतर लाभार्थ्यांचे बोटांचे ठसे आधार प्रमाणीकरणाच्या वेळी नोंदविले जात नसल्यामुळे त्यांना अडचणी येऊ शकतात. अशा लाभार्थ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने 19 ऑगस्ट 2026 रोजी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित केली आहे.या कार्यप्रणालीनुसार संबंधित पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत एकवेळ समझोता योजनेच्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील 4 हजार 644 पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या सर्व शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत,संबंधित बँक किंवा विकास संस्थेच्या शाखेत उपलब्ध असलेल्या यादीत आपले नाव व कर्जखात्याचा तपशील तपासावा.यादीत नमूद केलेली शेतकरी हिस्सा रक्कम तातडीने संबंधित बँकेत जमा करावी.त्यानंतर बँकेमार्फत पोर्टलवरील माहिती अद्ययावत झाल्याची खात्री करून ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरणाची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.
शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यास शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्जखात्यावर जमा होऊन त्यांना थकीत कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होता येणार आहे.जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन कर्जमुक्तीच्या दिशेने पुढाकार घ्यावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.