धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसाने दिलेली ओढ आणि वाढत्या तापमानाचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. परिणामी उसाचे उत्पादन निम्म्याने घटण्याची शक्यता असून, एकरी सरासरी 40 टनांवरून उत्पादन 15 ते 20 टनांपर्यंत खाली आले आहे. जिल्ह्यात अपेक्षित 50 लाख मेट्रिक टनांऐवजी केवळ 30 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 20 लाख मेट्रिक टन उत्पादनाची तूट निर्माण होऊन, प्रतिटन तीन हजार रुपये दरानुसार शेतकऱ्यांचे तब्बल 600 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यातच पाणीटंचाईमुळे नवीन ऊस लागवड ठप्प झाल्याने पुढील वर्षीही साखर उद्योगासमोर मोठे संकट उभे राहणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीने शेतीचे अर्थकारण पूर्णपणे विस्कळीत केले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपाठोपाठ आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जून आणि जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारली. ऑक्टोबरमधील परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने उसाच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला. त्यात वाढत्या तापमानाची भर पडल्याने उभ्या उसाची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी ऊस वाळण्यास सुरुवात झाली आहे.
साधारणपणे धाराशिव जिल्ह्यात एकरी सरासरी 40 टन, तर हेक्टरी 100 टन उसाचे उत्पादन होते. कळंब आणि परंडा तालुक्यांतील काही भागांत हेक्टरी 150 टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा पाणीटंचाईमुळे एकरी 20 ते 25 टन उत्पादनाची घट होत असल्याचे चित्र आहे. म्हणजेच अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. उसाच्या उत्पादनातील ही घट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम करणारी ठरत आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, यंदाच्या गाळप हंगामासाठी जिल्ह्यात 60 हजार 339 हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध आहे. गतवर्षी सुमारे 58 हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाचे गाळप झाले होते. यंदा क्षेत्र वाढलेले दिसत असले तरी प्रत्यक्षात उसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.
जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा नऊ साखर कारखान्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत 9 लाख 558 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून केवळ 7 लाख 22 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा साखर उतारा अवघा 7.91 टक्के नोंदविण्यात आला आहे. कमी साखर उताऱ्याचा फटका साखर कारखान्यांबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसत आहे. जिल्ह्यातील एकूण ऊस क्षेत्रापैकी जवळपास पाच हजार हेक्टरवरील ऊस पाण्याअभावी पूर्णपणे जळून गेला आहे. तर पाच हजार हेक्टरवरील ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरला जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष गाळपासाठी उपलब्ध राहणारे क्षेत्र सुमारे 50 हजार हेक्टरपर्यंत मर्यादित राहणार आहे.
30 लाख मेट्रिक टन गाळप होण्याचा अंदाज
यंदा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पंधरा दिवस आधी, म्हणजे 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आला. साखरेची मागणी आणि पावसाळा लवकर संपल्याने कारखान्यांनी लवकर गाळप सुरू केले. मात्र, जिल्ह्यात नऊ गुळ पावडर कारखानेही सुरू असल्याने उसाच्या एकूण गाळपाचा नेमका आकडा समोर येत नाही. मागील महिनाभरात सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाचे गाळप झाल्याचा अंदाज आहे. साखर कारखान्यांकडून आतापर्यंत झालेल्या सुमारे नऊ लाख मेट्रिक टन गाळपाबरोबरच गुळ पावडर कारखान्यांनी केलेले अंदाजे पाच लाख मेट्रिक टन गाळप विचारात घेतल्यास जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 15 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असावे, असा अंदाज आहे. साखर कारखाने आणखी दीड महिना पूर्ण क्षमतेने सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 31 डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील उपलब्ध उसाचे गाळप पूर्ण होऊ शकते. सध्याच्या गाळप क्षमतेनुसार आणखी 15 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात एकूण गाळप 30 लाख मेट्रिक टनांपर्यंतच मर्यादित राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
20 लाख टनांची तूट; शेतकऱ्यांचे 600 कोटींचे नुकसान
सामान्य परिस्थितीत जिल्ह्यातील 60 हजार हेक्टरवरील उसाचे गाळप झाल्यास जवळपास 50 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र, यंदा दुष्काळामुळे प्रत्यक्ष गाळप 30 लाख मेट्रिक टनांपर्यंतच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तब्बल 20 लाख मेट्रिक टन उसाची घट होणार आहे. उसाला प्रतिटन तीन हजार रुपये दर गृहीत धरल्यास 20 लाख मेट्रिक टन उसाच्या उत्पादनातील तुटीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल 600 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सोयाबीनसह खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता ऊस उत्पादनातील घटीचा मोठा फटका बसणार आहे. परिणामी, ग्रामीण अर्थव्यवस्थेतील पैशांचा प्रवाह कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यंदा नवीन ऊस लागवड ठप्प; पुढील वर्षी कारखान्यांसमोर संकट -
यंदा ऊस उत्पादनात मोठी घट होत असतानाच पुढील वर्षाच्या हंगामाची परिस्थितीही चिंताजनक बनली आहे. जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी असल्याने नवीन ऊस लागवड जवळपास पूर्णपणे ठप्प झाली आहे. आधीच लागवड केलेला ऊस जगविणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. पाण्याअभावी ऊस जोपासण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. विशेष म्हणजे, यंदा उसाची तोड झाल्यानंतर अनेक शेतकरी खोडवा न ठेवता ऊस पीक मोडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील वर्षी जिल्ह्यातील ऊस क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे. सध्या उपलब्ध परिस्थितीचा विचार करता पुढील वर्षी जिल्ह्यातील ऊस क्षेत्र केवळ 20 हजार हेक्टरपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा उत्पादन घटल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांसमोर पुढील वर्षी गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.
