धाराशिव (प्रतिनिधी)- येरमाळा  येथील अमोल बापुराव पाटील यांचा शेतातील डीपीत शॉर्टसर्किट झाल्याने पाच एकर ऊस जळाल्याचा प्रकार गुरुवारी (ता. 29) दुपारी दीड वाजता घडला. या घटनेनंतर धाराशिव जिल्ह्याचे शेतकरी नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जळालेल्या ऊसाच्या फडाची पाहणी करून शेतकऱ्याला मदतीचा विश्वास दिला.

येरमाळा ते कळंब रोडवरील खारवती शिवारातील अमोल बापुराव पाटील यांचा पाच एकर ऊस जळाला. पानगाव फिडरवरील पाटील डीपीत दुपारी थ्री फेज विद्युत पुरवठा चालू झाल्यास डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन जाळ झाला. डीपीच्या खाली बांधावर गवत वाळलेले असल्याने डीपीतील खाली पडलेल्या जाळाने गवतासह बांधाशेजारी अमोल बापुराव पाटील यांच्या सर्वे. नं. 37/43 मधील पाच एकर ऊसाला आग लागून तो जळाला.

एकीकडे यंदाची दुष्काळी स्थितीमुळे खरीप पिकं पावसाअभावी गेल्याने नुकसान झाले असताना ऊसतोड येईपर्यंत आहे तेवढ्या पाण्यावर पोसलेला चांगला ऊस जळाल्याने आता ऊसाच्या उत्पन्नातही मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने सहा लाखाचे नुकसान सांगितले असले तरी एकरी साठ टनानुसार पाच एकरातील ऊस जळून 300 टनाचे म्हणजे नऊ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा निष्कर्ष संजय पाटील दुधगावकर यांनी पाहणीदरम्यान काढला.

जाळलेल्या उसाचे वजन आणखी घटूनये यासाठी कारखान्यानी तात्काळ ऊस तोड देण्यासाठी आणि झालेले नुकसान मोठे असले तरी शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांनी शेतकरी अमोल पाटील यांना गावातील जमलेल्या शेतकऱ्या समक्ष दिला. या वेळी शेतकरी दत्ता बारकुल, राजेश निचळे, राजन पाटील, बापु जमदाडे, सचिन बारकुल, रामेश्वर टेकाळे उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच महावितरण आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही भेट देऊन पाहणी केली.

 
Top