धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी काळातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने राघुचीवाडी येथे महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात राघुचीवाडी शिवारातील तब्बल 250 एकर क्षेत्रावर चारा लागवड सुरू करण्यात आली आहे. यातून अंदाजे 3000 टन चारा उत्पादन अपेक्षित आहे. यासाठी परिसरातील 160 शेतकरी बांधवांना एसएस फीड जवार (कडवळ) एकूण एक हजार किलो बियाणे मोफत वितरित करण्यात आले आहे. यातून हेक्टरी सुमारे 30 टन प्रमाणे 3000 टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अपेक्षित असून, दुष्काळाच्या काळात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढण्यासोबतच शेतकरी बांधवांसाठी उत्पन्नाचे नवे साधन निर्माण होणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसातील मोठ्या खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून, आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा योग्य विनियोग करून चारा उत्पादन वाढविण्याचा विचार पुढे आला. हमीभावाने चारा खरेदी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा पर्याय निर्माण झाला आहे. धाराशिव शहरातील सांडपाणी भोगावती नदीच्या माध्यमातून राघुचीवाडी तलावात जमा होते. या तलावातील उपलब्ध पाण्याचा उपयोग चारा निर्मितीसाठी करता येऊ शकतो अशी संकल्पना आपण या परिसरातील शेतकरी बांधवांसमोर मांडली असता त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तलावातील पाणीउपसा बंद करण्यात आल्याने शेतीसाठी या पाण्याचा वापर करता येत नव्हता त्यानुसार आपण जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक परवानगी देण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार पाणीउपसा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर शेतकरी बांधवांना बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. शनिवारी चारा लागवडीचा शुभारंभ करण्यात आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. राघुचीवाडी तलावातील उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून चारा उत्पादन करण्याचा हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे.
