धाराशिव (प्रतिनिधी)-दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांच्या हाताला काम,जनावरांना चारा आणि प्रत्येक गावाला पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणांनी संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करावे.दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना केवळ कागदावर न राहता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी गावपातळीवर दिसली पाहिजे.शेतकऱ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगारनिर्मितीला प्राधान्य देऊन पाणी,चारा,जलसंधारण आणि रोजगार हमीच्या कामांचे गावनिहाय सूक्ष्म नियोजन करावे. विशेषतः संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना उपजीविकेची पर्यायी साधने उपलब्ध करून द्यावीत,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातून आज ३१ ऑक्टोबर रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा म्हाडदळकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनीही संबंधित यंत्रणांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील पाणीपुरवठा, पशुधनासाठी चारा उपलब्धता, रोजगारनिर्मिती,जलसंधारणाची कामे आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी यांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला
जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.आता दुष्काळ निवारणाच्या पुढील टप्प्यात प्रत्येक गावातील पाणीटंचाईची स्थिती,रोजगाराची गरज आणि रोजगार हमीअंतर्गत हाती घेता येणाऱ्या कामांची माहिती संकलित करावी.ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून,त्यानुसार उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. गावनिहाय पशुधनाची मोजणी करून त्यासाठी किती चाऱ्याची आवश्यकता भासणार आहे,याची अचूक माहिती उपलब्ध ठेवावी. किती शेतकऱ्यांना चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले,किती क्षेत्रावर चारा लागवड झाली, त्यातून किती उत्पादन अपेक्षित आहे आणि तो चारा कोणत्या महिन्यापर्यंत उपलब्ध राहणार आहे,याचा तपशील तयार करावा. गावपातळीवर नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी चारा लागवडीची प्रत्यक्ष पाहणी करून लागवड कुठे आणि किती क्षेत्रावर झाली,याची खातरजमा करावी.उपलब्ध उसाचा चारा आणि नव्याने केलेल्या लागवडीतून मिळणारा चारा यांचाही गावनिहाय अंदाज तयार ठेवावा.असे श्री.पुजार म्हणाले.
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून श्री.पुजार म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि राज्याच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून द्यावा.उपविभागीय अधिकाऱ्यांपासून गावपातळीवरील नोडल अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी नियमित गावभेटी देऊन स्थानिक परिस्थिती जाणून घ्यावी.गावागावांत श्रमदानाचे उपक्रम आणि बैठका आयोजित करून विहिरी व विंधन विहिरींचे पुनर्भरण,जलसंधारण, चारा लागवड आणि पाणीसंवर्धनाच्या कामांना गती द्यावी.स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्यास कामाच्या शोधात होणारे स्थलांतर रोखण्यास मदत होईल.लोकप्रतिनिधींशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांना दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकांसाठी निमंत्रित करावे आणि स्थानिक गरजांनुसार उपाययोजनांचे नियोजन करावे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता व्यक्त करताना जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, गावपातळीवर शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी थेट संवाद साधावा.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची तसेच आर्थिक,सामाजिक आणि मानसिक संकटात असलेल्या शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करून त्यांच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा.अशा कुटुंबांना प्राधान्याने जोडधंदे आणि उत्पन्नाची पर्यायी साधने कशाप्रकारे उपलब्ध करून देता येतील,याचे नियोजन करावे. प्रगतिशील शेतकऱ्यांना आमंत्रित करून त्यांच्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे. दुष्काळी परिस्थितीत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांवर सक्ती करू नये,याबाबत संबंधितांना सक्त सूचना द्याव्यात. कर्जवसुलीसाठी कोणत्याही अधिकाऱ्याने सक्तीचा तगादा लावल्यास संबंधितांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची कारवाई करावी,असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.म्हाडदळकर म्हणाल्या की,दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण आणि त्यासाठी पुरेशा चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे.त्यासाठी प्रत्येक गावातील पशुधनाची प्रत्यक्ष मोजणी करून जनावरांची निश्चित संख्या उपलब्ध करून द्यावी.या पशुधनासाठी दररोज किती चारा आणि पशुखाद्याची आवश्यकता आहे, याचा अचूक अंदाज तयार करावा. केवळ उपलब्ध आकडेवारीवर अवलंबून न राहता गावपातळीवरील वस्तुस्थितीची पडताळणी करून माहिती संकलित करावी.
सध्या उपलब्ध असलेला चारा किती दिवस पुरणार आहे,याची माहिती नियमितपणे अद्ययावत ठेवावी.या माहितीच्या आधारे पुढील कालावधीतील संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन चारा उपलब्धतेचे नियोजन करावे. तालुकास्तरीय सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून काम केल्यास दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना अधिक परिणामकारकपणे राबविता येतील.पशुसंवर्धन,कृषी,महसूल आणि पंचायत राज यंत्रणांनी एकत्रितपणे काम करून पशुपालकांच्या गरजा वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत,असे त्यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर म्हणाले की, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक सक्रियपणे काम करण्याची आवश्यकता आहे. दुष्काळ निवारणाच्या कामात निष्क्रिय असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने काम करण्याच्या सूचना द्याव्यात.क्षेत्रीय स्तरावर उपाययोजनांची अंमलबजावणी करताना कोणत्या अडचणी येत आहेत,याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ द्यावी. त्यामुळे त्या अडचणींची तातडीने सोडवणूक करून कामांना गती देता येईल.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे सांगून श्री.कडवकर म्हणाले की, जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्प आणि तलावांमध्ये सध्या किती पाणीसाठा उपलब्ध आहे,याची अद्ययावत माहिती तयार करावी. तलाव आणि प्रकल्पांमधील गाळ काढण्याचे नियोजन करताना त्यातून किती अतिरिक्त पाणीसाठवण क्षमता निर्माण होणार आहे याचाही अंदाज घ्यावा. कोणत्या तलावांना दुरुस्तीची आवश्यकता आहे,याची पाहणी करावी.ज्या प्रकल्पांतून किंवा तलावांतून पाण्याची गळती सुरू आहे,त्यांच्या दुरुस्तीचे नियोजन प्राधान्याने करावे.उपलब्ध पाण्याचा पिण्यासाठी तसेच चारा लागवडीसाठी कशा प्रकारे उपयोग करता येईल,याचाही आतापासून विचार करावा.
जलसंधारणाची कामे गावपातळीवरील गरजांशी जोडण्यावर भर देताना श्री. कडवकर म्हणाले की,जिल्ह्यातील सिमेंट बंधाऱ्यांची यादी तयार करून कोणत्या बंधाऱ्यांना दुरुस्तीची आवश्यकता आहे,याची माहिती संकलित करावी. दुरुस्तीच्या कामांना प्राधान्यक्रम निश्चित करून नियोजन करावे. सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने कोणत्या गावांत जलसंधारण आणि पाणीसंवर्धनाची कामे करता येतील,याची चाचपणी करावी. गावपातळीवर नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांची यादी तयार ठेवून त्यांच्यामार्फत कामांचा नियमित आढावा घ्यावा. स्थानिक लोकसहभाग आणि विविध यंत्रणांच्या समन्वयातून दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित धाराशिव तहसीलदार डॉ.श्रीमती.मृणाल जाधव यांनी धाराशिव तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या बळीराजा नवचेतना अभियानाची माहिती दिली.
दूरदृश्य प्रणालीद्वारे ९८ अधिकाऱ्यांचा सहभाग
या आढावा बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सागर खटकाळे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दीपक मुळे,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.थोरात, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.सुनील कटकधोंड,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन योजनांचे कार्यकारी अभियंता,कृषी विकास अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी,सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी असे जवळपास ९८ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत ऑनलाईन उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत पाणीटंचाई आणि दुष्काळ निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती सादर केली.पाणीपुरवठा,चारा उपलब्धता,रोजगार हमीची कामे, जलसंधारण आणि शेतकरी कुटुंबांना मदत या बाबींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.दुष्काळ निवारणासाठी सर्व विभागांनी समन्वयातून काम करून गावपातळीवरील गरजांनुसार उपाययोजना राबविण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
