धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलनाची धग वाढत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची पहिली उचल प्रतिटन 5 हजार रुपये मिळावी, या प्रमुख मागणीसाठी संघटनेने राज्य व केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे आर्थिक संकट, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पीकविमा आणि कर्जवसुली अशा विविध ज्वलंत प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन उभारण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या 12 प्रमुख मागण्या सरकारसमोर मांडण्यात आल्या आहेत.
यामध्ये जनावरांसाठी चारा छावण्यांऐवजी दावणीला चारा उपलब्ध करून देणे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देणे, आटलेल्या विहिरींमधील गाळ मोफत काढण्यासाठी आर्थिक मदत देणे, रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात काम उपलब्ध करून देणे, उसाची प्रतिटन 5 हजार रुपये करणे, उसाची पहिली उचल प्रतिटन 5 हजार रुपये देणे, शेतकऱ्यांना 100 टक्के पीकविमा भरपाई देणे, 2025 च्या पीकविमा योजनेतून वगळलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देणे, बंद रेशनकार्ड पुन्हा सुरू करणे, सरकारी व खासगी बँका तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली थांबवणे, शेतीसाठी घेतलेल्या ट्रॅक्टर व यंत्रसामग्रीच्या कर्जहप्त्यांची वसुली स्थगित करणे आणि शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरला मोफत डिझेल देणे, अशा मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनाची सुरुवात तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेच्या चरणी साकडे घालून करण्यात येणार आहे. शनिवार, दि. 7 नोव्हेंबर 2026 रोजी तुळजापूर येथील जुने बसस्थानक परिसरात भव्य रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी केले आहे. 'सरकार आमचं ऐका, नाहीतर माझ्याकडे पैका नाही!' या घोषणेतून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि सरकारविरोधातील संताप व्यक्त करत शेतकरी एकजुटीचे दर्शन घडविण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.
