धाराशिव (प्रतिनिधी)- बालकांचे हक्क सुरक्षित राहावेत, त्यांना भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण मिळावे तसेच संकटात सापडलेल्या बालकांना वेळीच मदतीचा हात मिळावा,या उद्देशाने जिल्ह्यात चाईल्ड हेल्पलाईन कक्ष 1098 च्या वतीने विविध शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना बालहक्क, बालविवाह प्रतिबंध,‌‘बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियान आणि बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे आणि चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे प्रकल्प समन्वयक व्ही.पी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये हे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत धाराशिव येथील नगरपालिका शाळा क्रमांक 19, विजयसिंहराजे प्राथमिक विद्यालय,स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिर,जीवनराव गोरे विद्यालय,सह्याद्री नर्सिंग कॉलेज,भूम येथील सौ.राणीतारा प्रशाला,गुरुदेव विद्यालय,रवींद्र विद्यालय,येडशी पब्लिक स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावसूद,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगोली आणि सरस्वती प्रायमरी स्कूल शिंगोली या 12 शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली.

यावेळी बालकांचे हक्क,त्यांचे संरक्षण,बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम तसेच मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.‌‘बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाच्या माध्यमातून मुलींचे शिक्षण,संरक्षण आणि सक्षमीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.बालकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांचीही माहिती देण्यात आली.


संकटातील बालकांसाठी ‌‘1098' हेल्पलाईनचा आधार

बालकांवर होणारा अन्याय, अत्याचार,बालविवाह किंवा अन्य संकटाच्या प्रसंगी मदतीसाठी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 चा उपयोग करता येतो.संकटात सापडलेल्या बालकांना वेळेवर मदत मिळावी,यासाठी या हेल्पलाईनची माहिती प्रत्येक बालकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे या जनजागृती कार्यक्रमांतून दिसून येते. चाईल्ड हेल्पलाईन कक्षाच्या समुपदेशक वंदना कांबळे, सुपरवायझर अमर भोसले, पल्लवी पाटील आणि केस वर्कर अभयसिंह काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून हेल्पलाईनच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.तसेच बालकांच्या विविध समस्या जाणून घेत त्यांना बालसंरक्षण आणि उपलब्ध मदत यंत्रणेबाबत मार्गदर्शन केले. या जनजागृती कार्यक्रमांना संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.बालकांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांना आपल्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.


 
Top