भूम (प्रतिनिधी)- भूम बस आगारातून सकाळी 8 वाजता सुटणारी भूम-बोरीवली एस.टी. बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बस सेवा बंद असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून सेवा सुरू न केल्यास नागरिक व प्रवाशांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भूम बस आगारातील वाहतूक नियंत्रक शिनगारे यांना निवेदन देण्यात आले. भूम शहरासह परिसरातून मुंबईकडे नोकरी, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच विविध कामांसाठी मोठ्या संख्येने नागरिक नियमित प्रवास करतात. सकाळी 8 वाजता भूम येथून बोरीवलीसाठी थेट एस.टी. बस उपलब्ध असल्याने प्रवाशांना मोठी सोय होत होती. मात्र, सदर बस सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना इतर बस अथवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी प्रवाशांना आर्थिक भुर्दंडासह वेळेचाही अपव्यय सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू न केल्यास प्रवाशांच्या हक्कासाठी नागरिक व प्रवाशांना सोबत घेऊन एस.टी. महामंडळाच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी जनशक्ती विकास आघाडीचे नगर परिषद गटनेते रुपेश परमेश्वर शेंडगे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भूम-परंडा-वाशी समन्वयक दिलीप शाळू महाराज, नगरसेवक विठ्ठल बागडे आणि नगरसेवक चंद्रमणी गायकवाड उपस्थित होते.
