धाराशिव (प्रतिनिधी)- बालकांचे आरोग्य सुदृढ असेल,तरच उद्याची पिढी निरोगी, सक्षम आणि बुद्धिमान घडेल. बालकांच्या निरोगी वाढीमध्ये अडथळा ठरणाऱ्या जंतसंसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला असून, 'निरोगी बालक,सुदृढ भविष्य' या संकल्पनेतून धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 1 ते 19 वर्षे वयोगटातील तब्बल 4 लाख 36 हजार 243 पात्र बालकांना आणि किशोरवयीन मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 1 हजार 461 शाळा, 1 हजार 748 अंगणवाड्या आणि 303 आरोग्य संस्थांच्या माध्यमातून एकाच दिवशी व्यापक स्वरूपात ही मोहीम राबविण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी दिली.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येरमाळा यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा येरमाळा येथे मोहिमेचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फुलारी,जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गोवर्धन महेंद्रकर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येरमाळा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधाकर बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती.
