धाराशिव (प्रतिनिधी)-  आई तुळजाभवानीच्या दर्शनाची ओढ,मनात अपार श्रद्धा आणि पावलोपावली भक्तिभाव अशा वातावरणात जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून तुळजापूरच्या दिशेने पायी प्रस्थान केले. 1996 ते 1998 च्या दरम्यान जिल्हाधिकारी म्हणून राजेश कुमार यांनी पदभार संभाळला होता. त्यांच्या काळापासूनच जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पातळीवरील अनेक अधिकारी नवरात्रात अथवा पौर्णिमेच्या दिवशी तुळजापूरची पायी जाण्याची परंपरा सुरू केली आहे. 

विशेष म्हणजे,त्यांच्या या भक्तिमय पायी प्रवासात सौम्याश्री पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विश्वास करे, कृषी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे,महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे, धाराशिव तहसीलदार डॉ.मृणाल जाधव, तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे, धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात कोजागिरी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.  रविवार,25 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असून,श्री तुळजाभवानी मंदिराची पौर्णिमा सोमवार,26 ऑक्टोबर रोजी असणार आहे.या पार्श्वभूमीवर तुळजापूरच्या धार्मिक वातावरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

 
Top