तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काळेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी महिला भगिनींना दूरवर भटकंती करावी लागत असून, ग्रामस्थांचे हाल होत आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी सोमवारी पंचायत समिती तुळजापूरचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांना निवेदन देऊन नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. तसेच, चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
काळेगावातील पाणीटंचाईबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. पाणी हा मूलभूत हक्क असून, नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी ग्रामस्थांशी बोलताना गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी, पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहणाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्यावर अधिग्रहणाची प्रक्रिया केली जाते, असे सांगितले.
या निवेदनावर किशोर घाडगे, अक्षय मुळे राम शिंदे, शंकर विक्रे, विशाल मुळे आदी ग्रामस्थांची नावे आहेत. आता प्रशासन या पाणीटंचाईच्या प्रश्नावर काय उपाययोजना करणार, याकडे काळेगावातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.