धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत यंदा पाणी उपलब्धतेचा मुद्दा चिंतेचा झाला आहे. उपलब्ध जलसाठ्यांमधील पाण्याचे बाष्पीभवन कमी करून पाण्याची बचत करणे हे खरे तर मोठे आव्हान आहे. जलाशय, सिंचन तलाव, पाझर तलाव आणि अन्य योग्य जलसाठ्यांवर ईएसएम अर्थात बाष्पीभवन-प्रतिबंधक रासायनिक एकस्तरीय आवरण तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर करण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याच्या महसूल तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे केली आहे.

सध्या जिल्ह्यातील जलाशयांमध्ये उपलब्ध जिवंत पाणीसाठा अत्यल्प आहे. तो सुमारे आठ टक्क्यांच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे आवश्यक आहे. हवामानातील बदलांमुळे आगामी काळात अलनिनो परिस्थितीची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे तापमानात सुमारे चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तापमान वाढल्याने जलाशयांमधील बाष्पीभवनाचा वेग सामान्य परिस्थितीच्या तुलनेत सुमारे 25 टक्क्यांनी वाढू शकतो, असेही आमदार पाटील यांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.  या पार्श्वभूमीवर जलाशयातील बाष्पीभवन कमी करण्यासाठी आधुनिक व शास्त्रोक्त तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. ईएसएम तंत्रज्ञानामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर सूक्ष्म आवरण तयार होऊन पाण्याच्या वातावरणात होणारे उत्सर्जन कमी करण्यास आणि परिणामी बाष्पीभवनाचा वेग घटविण्यास मदत होते.


‌‘पायलट प्रोजेक्ट' राबविण्याची मागणी

या तंत्रज्ञानाची परिणामकारकता, तापमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता, जलाशयाचे क्षेत्रफळ, पाण्याची गुणवत्ता आणि स्थानिक हवामान परिस्थिती यांसारख्या घटकांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी अंमलबजावणी करण्याऐवजी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था तसेच संबंधित तज्ज्ञ संस्थांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यातील निवडक जलाशयांवर प्रायोगिक प्रकल्प राबविणे अधिक योग्य ठरेल, असे आमदार पाटील यांनी सुचविले आहे. 

 
Top