धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सरकारी, खासगी व सहकारी बँका, नॉन-बँकिंग वित्तीय संस्था तसेच विविध फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुली तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मराठवाड्यासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर कोरडा दुष्काळ पडला आहे. गेल्या दीड महिन्यापेक्षा अधिक काळापासून पावसाने मोठी उघडीप दिल्याने शेतकरी, शेतमजूर आणि रोजंदारीवर काम करणारे कामगार गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत.

धाराशिव जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेती व शेतीपूरक रोजगारावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत सरकारी व खासगी बँका, सहकारी बँका,  तसेच विविध फायनान्स कंपन्यांकडून दुचाकी कर्ज, वाहन कर्ज, बचत गट कर्ज, शेती कर्ज, सोने तारण कर्ज तसेच इतर विविध कर्जांची वसुली सातत्याने केली जात आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांवरील मानसिक व आर्थिक ताण वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व सरकारी, खासगी व सहकारी बँका, नॉन-बँकिंग वित्तीय संस्था आणि सर्व फायनान्स कंपन्यांना कर्जवसुली तात्काळ स्थगित करण्याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात, तसेच जिल्हा अग्रणी बँकेमार्फत सर्व बँकांना याबाबत सूचना देऊन दुष्काळाच्या काळात शेतकरी, शेतमजूर, कामगार व सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देण्यासाठी सहकार्य करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. “दुष्काळाच्या या कठीण काळात जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून तात्काळ कार्यवाही करावी,” अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

 
Top