धाराशिव (प्रतिनिधी)- पुणे येथे होणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्यविश्वातील ऐतिहासिक पर्व ठरणार आहे. या शतकमहोत्सवी साहित्य संमेलनाची नांदी म्हणून विविध जिल्ह्यांमध्ये 99 नांदी साहित्य संमेलने आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धाराशिव जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ‌‘नांदी साहित्य संमेलन' आयोजित करण्यात येणार आहे.

या आयोजनाच्या अनुषंगाने अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती देवगिरी प्रांत, शाखा धाराशिव जिल्ह्याच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक येथील व्यंकटेश महाजन महाविद्यायात घेण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित होणारे धाराशिवचे नांदी साहित्य संमेलन जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, लेखक, विविध साहित्य संस्था, वाङ्मय मंडळे आणि साहित्यप्रेमींना एकत्र आणणारे व्यापक व्यासपीठ ठरावे, यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

संमेलनाची तारीख व स्थळ निश्चित करणे, स्वागताध्यक्ष व संमेलनाध्यक्षांची निवड, उद्घाटन व समारोप समारंभ, परिसंवाद, कवी संमेलन, निमंत्रित साहित्यिक व मान्यवर, प्रसिद्धी-प्रसार, नियोजन तसेच विविध समित्यांची स्थापना यासह संमेलनाच्या आयोजनातील विविध बाबींवर विचारविनिमय करण्यात आला.

धाराशिव जिल्ह्यातील विविध साहित्य संस्था आणि साहित्यिक संघटनांना या नांदी साहित्य संमेलनाच्या आयोजनात सहभागी करून घेण्यात येणार असून, त्यांच्या समन्वयातून संमेलनाला व्यापक व सर्वसमावेशक स्वरूप देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निर्माण झालेला साहित्यिक उत्साह धाराशिव जिल्ह्यातही पोहोचवून 99 नांदी साहित्य संमेलनांच्या मालिकेतील धाराशिवचे नांदी साहित्य संमेलन संस्मरणीय करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत चौधरी, साहित्य भारती देवगिरी प्रांताचे संघटनमंत्री युवराज नळे, ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे, साहित्य भारती धाराशिव जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे, प्रा. डॉ. कृष्णा तेरकर, जेष्ठ साहित्यिक रविंद्र शिंदे , सुरेश शेळके सहसंघटक समाधान शिकेतोड, प्रा. डॉ. सहदेव रसाळ, रुपेशकुमार जावळे, प्रशांत गुरव,  आदी उपस्थित होते.

 
Top