धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि धाराशिवचे भूमिपुत्र डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विधान परिषदेत पाठविण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. पदवीधर आणि शिक्षकांच्या विविध समस्या समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.

धाराशिव येथे आयोजित पदवीधर संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, डॉ. प्रतापसिंह पाटील हे उच्चशिक्षित असून त्यांना पदवीधर बांधवांच्या तसेच शिक्षकांच्या विविध प्रश्नांची आणि समस्यांची जाण आहे. पदवीधरांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि त्यांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील युवकांचा आवाज विधान परिषदेत पोहोचविण्यासाठी पदवीधरांनी आपल्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पदवीधर युवकांच्या रोजगाराचा प्रश्न, मराठवाड्यातील औद्योगिक विकास आणि उच्चशिक्षित बेरोजगारांच्या समस्यांवर आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले की, मराठवाड्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी इतर शहरांमध्ये स्थलांतर करावे लागू नये, यासाठी या भागात उद्योगधंदे आणणे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे आवश्यक आहे. पदवीधर युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. पदवीधरांच्या विकासासाठी उपलब्ध निधीचा उपयोग त्यांच्या हिताच्या आणि रोजगारनिर्मितीशी संबंधित उपक्रमांसाठी करण्यावर भर दिला जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पदवीधरांच्या समस्या केवळ निवडणुकीपुरत्या मर्यादित न राहता त्यावर सातत्याने काम होणे गरजेचे आहे. युवकांना रोजगार, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय आणि पदवीधरांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या संवाद मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शशिकांत शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, प्रदेश सरचिटणीस मसूदभाई शेख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, ॲड. धीरज पाटील, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, ज्येष्ठ नेत्या शहापूरकर, महिला जिल्हाध्यक्षा मनीषा राखुंडे, उमरगा तालुकाध्यक्ष संजय पवार, कळंब तालुकाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, किरण काळे, नरदेव कदम, धनंजय राऊत, श्याम घोगरे, आश्लेष मोरे, बबलूबाई शेख, प्रशांत पाटील, सुनील आंबेकर आणि तेजस भालेराव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top