धाराशिव (प्रतिनिधी)- दुष्काळसदृश परिस्थितीत पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविणे, जनावरांचे आरोग्य जपणे आणि पशुपालकांना शाश्वत चारा व्यवस्थापनाचे पर्याय उपलब्ध करून देणे या उद्देशाने घरडा केमिकल्स प्रकल्पांतर्गत बायफ बीआयएसएलडी विभागीय कार्यालय, धाराशिव आणि मानवलोक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने घरडा कृषी संशोधन केंद्र, कसगी येथे चारा व्यवस्थापन व पशुसंवर्धन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत तुळजापूर तालुक्यातील कुंभारी, सरडेवाडी, कोरेवाडी, गोंधळवाडी, बीजनवाडी आणि खोतांचीवाडी या सहा गावांतील महिला पशुपालकांसाठी 10,000 बीएचएन-11 (-11) हायब्रीड नेपियर चारा लागवडीच्या ठोंब्यांचे वाटप करण्यात आले. तसेच घरडा कृषी संशोधन केंद्रामध्ये प्रात्यक्षिक तत्त्वावर नेपियर चाऱ्याची लागवड करण्यासाठी अतिरिक्त 5,000 ठोंबे उपलब्ध करून देण्यात आले. या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून चारा उत्पादन व व्यवस्थापनाच्या सुधारित पद्धतींचा प्रसार करण्याचे नियोजन आहे.
दुष्काळी परिस्थितीत पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने ज्या महिला पशुपालकांकडे काही दिवस चारा लागवडीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे, अशा पशुपालकांना प्राधान्य देण्यात आले. जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करून देण्याबरोबरच पशुधनाचे पोषण सुधारण्यासाठी सुमारे 50 पशुपालकांना खनिज मिश्रणाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान मानवलोक संस्थेचे श्री. सिद्धराज चौधरी व उपस्थित प्रतिनिधींनी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाणी, चारा आणि इतर संसाधनांचा योग्य वापर करून पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
बायफ बीआयएसएलडीचे विभागीय प्रकल्प अधिकारी श्री. अतुल मुळे यांनी सकस पशुआहाराचे महत्त्व, सोयाबीनच्या भुसकटावर योग्य प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविण्याच्या पद्धती, खनिज मिश्रणाचा जनावरांच्या आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम आणि दुष्काळाच्या काळात जनावरांची घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर, संतुलित आहार आणि चारा साठवण यांचे नियोजन केल्यास पशुपालकांना प्रतिकूल परिस्थितीतही जनावरांचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बायफच्या प्रतिनिधी नूतन क्षीरसागर यांनी बायफ संस्थेच्या कार्याची, पशुधन विकास कार्यक्रमांची आणि पशुपालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच हायड्रोपोनिक चारा उत्पादन आणि अझोला उत्पादन तंत्रज्ञान यांसारख्या पर्यायी चारा उत्पादन पद्धतींबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
घरडा केमिकल्स प्रकल्प, बायफ बीआयएसएलडी आणि मानवलोक यांच्या माध्यमातून पशुपालकांना चारा उत्पादन, पशुधनाचे पोषण, जनावरांची आनुवंशिक सुधारणा आणि पशुसंवर्धनाशी संबंधित योजनांची माहिती देण्यात आली. या उपक्रमांमुळे पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन चारा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला मानवलोक संस्थेचे कर्मचारी, बायफचे प्रतिनिधी, महिला पशुपालक आणि इतर पशुपालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिला व पशुपालकांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
दुष्काळसदृश परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण, हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविणे आणि पशुपालकांना पर्यायी चारा व्यवस्थापन पद्धतींचे प्रशिक्षण देणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. घरडा केमिकल्स प्रकल्प, बायफ बीआयएसएलडी आणि मानवलोक यांच्या समन्वयातून भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून पशुपालकांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.