तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी तुळजापूर नगरीत राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक दाखल होत असताना, लातूर रस्त्यावरील नवीन बसस्थानक परिसरात मात्र अस्वच्छतेचे चित्र पाहायला मिळत आहे. बसस्थानकातील ड्रेनेज लाईन तुंबल्याने सांडपाणी परिसरात साचत असून, सर्वत्र दुर्गंधी पसरल्यामुळे भाविकांसह प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाच्या वतीने भाविक व प्रवाशांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे नवीन बसस्थानकातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत नसल्याचे चित्र समोर आले आहे. ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे घाण पाणी बसस्थानक परिसरात पसरत असून, या ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नवरात्र महोत्सवात अनेक भाविक बसने तुळजापूरमध्ये ये-जा करतात. बसस्थानक परिसरातून प्रवास करताना भाविक, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर प्रवाशांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. एकीकडे नवरात्र महोत्सवासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे बसस्थानकातील मूलभूत स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे या परिस्थितीवरून दिसून येत आहे. 

नवीन बसस्थानकातील तुंबलेली ड्रेनेज लाईन तातडीने मोकळी करून सांडपाण्याचा निचरा सुरळीत करावा, संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी भाविक व प्रवाशांकडून होत आहे. नवरात्र महोत्सवाच्या काळात तरी परिवहन विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रवाशांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


 
Top