तुळजापूर (प्रतिनिधी)- दुष्काळाच्या संकटात पाणी व चाऱ्याची मदत करण्याबरोबरच शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी कामगार, एकल व निराधार महिला तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांना मानसिक आधार देणे अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक संवेदनशीलता जपत जनजागृती, समुपदेशन आणि गरजू व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व ग्रामीण विकास तज्ज्ञ गणेश चादरे यांनी केले.
लोकमान्य युवा मंचच्या वतीने आयोजित ‘दुष्काळात एक हात मदतीचा' या उपक्रमांतर्गत युवकांना दुष्काळ निवारणासाठी नियोजनबद्ध सामाजिक कार्य करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. चादरे म्हणाले की, सामाजिक न्याय, मानवी प्रतिष्ठा आणि वंचित घटकांचे सक्षमीकरण ही सामाजिक कार्याची मूलभूत मूल्ये आहेत. दुष्काळाकडे केवळ पाणीटंचाई किंवा आर्थिक संकट म्हणून न पाहता त्याचे मानसिक, सामाजिक आणि भावनिक परिणामही समजून घेणे गरजेचे आहे. संकटग्रस्त व्यक्तींचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकून घेणे, त्यांना धीर देणे, आवश्यकतेनुसार व्यावसायिक समुपदेशन उपलब्ध करून देणे आणि शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणे ही काळाची गरज आहे.
दुष्काळाच्या काळात ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे, त्यांनी गरजू कुटुंबांना शक्य तेवढी मदत करावी. पशुधनासाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, तसेच पशू-पक्ष्यांसाठी पाणी व अन्न उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पाण्याचा पुनर्वापर करणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे यासाठी नागरिक, युवक, सामाजिक संस्था व स्थानिक प्रशासनाने समन्वयाने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
“दुष्काळ हा केवळ पाणीटंचाईचा प्रश्न नसून सामाजिक एकात्मता, संवेदनशीलता आणि माणुसकीची परीक्षा आहे. झाडांच्या मुळांना झालेली जखम जशी फांद्यांच्या हिरवेपणावर परिणाम करते, तशीच समाजातील एका घटकाची वेदना संपूर्ण समाजाला जाणवली पाहिजे. थेंब थेंब पाणी वाचवूया, घास घास चारा वाटूया आणि संकटग्रस्तांना मानसिक आधार देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया,” असे भावनिक आवाहन गणेश चादरे यांनी केले.याप्रसंगी लोकमान्य युवा मंचचे अध्यक्ष श्री. राहुल कणे, उपाध्यक्ष श्री. ओंकार मुळे, श्री. नंदकुमार हाजगुडे, रोहन हुच्चे, अभय भोसले, हर्षवर्धन चादरे, शौर्य निकम, शौर्य सूर्यवंशी, सौरभ घोडके, हर्ष मोरे आणि विश्वजीत रनमाळी उपस्थित होते.