तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिरातील पितळी दरवाजाजवळ पोलीस आणि खासगी सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेचे पडसाद शारदीय नवरात्र महोत्सवाच्या बंदोबस्तावर उमटताना दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्य गाभारा आणि पितळी दरवाजा परिसरात पोलिसांची तैनाती करण्यात आली असून, मंदिर परिसरातील बंदोबस्ताच्या नियोजनाबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
नवरात्र उत्सव अनुभवी स्थानिक मंडळी व पोलीस यांच्याशी समद्वय साधून यापूर्वी बंदोबस्त केला जात होता मात्र आता अधिकारी व स्थानिक नागरिकांशी होणारा संवाद पूर्णतः बंद झाल्याने अशा हाणामारीच्या घटना घडत आहेत. श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक तुळजापूरमध्ये दाखल होत आहेत. अशा गर्दीच्या काळात मंदिरातील सुरक्षा व्यवस्था चोख असणे अपेक्षित आहे. मात्र, मंदिरातील पोलीस आणि खासगी सुरक्षा रक्षक यांच्यातच वादाची ठिणगी पडल्याने बंदोबस्त व्यवस्थेतील समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, ज्या पितळी दरवाजाजवळ ही हाणामारी झाल्याचे सांगितले जात आहे, त्याच ठिकाणी आता पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मुख्य गाभाऱ्यात सिंह गाभारा येथे पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील इतर ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षक बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळत आहेत. या बदललेल्या व्यवस्थेमुळे नवरात्रोत्सवातील बंदोबस्तावर या वादाचा नेमका किती परिणाम झाला आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाचा अंतिम टप्पा जवळ येत असताना अश्विनी पौर्णिमेच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होणाऱ्या या कालावधीत मंदिरातील सुरक्षा व्यवस्था, दर्शनरांगा आणि गर्दी नियंत्रणाचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. अशा परिस्थितीत पोलीस आणि खासगी सुरक्षा रक्षकांमध्ये समन्वय राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.