तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज शनिवार, 17 ऑक्टोबर रोजी सातव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवींची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली.

धार्मिक आख्यायिकेनुसार, भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशैयावर विश्राम घेत असताना त्यांच्या नेत्रकमलात देवी विश्राम घेत होती. त्यावेळी विष्णूंच्या कानातील मलापासून शुंभ व निशुंभ हे दैत्य उत्पन्न झाले आणि त्यांनी विष्णूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी ब्रह्मदेवांनी देवीची स्तुती करून तिला जागविले. देवीने प्रकट होऊन त्या दैतांचा संहार केला आणि विष्णूंचे रक्षण केले. त्यानंतर भगवान विष्णूंनी आपली शेषशैया देवीला अर्पण केली. म्हणून शेषशाही अलंकार महापूजा मांडली जाते.

दरम्यान, शुक्रवार दि. 16 ऑक्टोबर रोजी रात्री श्री देवीजींची सिंह या वाहनावरून छबिना मिरवणूक पार पडली. यावेळी तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, तहसीलदार मृणाल जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, पोलीस निरीक्षक बालाजी येवते, सहायक व्यवस्थापक नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक अनुप ढमाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, पुजारी, सेवेकरी व भाविक उपस्थित होते.

 
Top