धाराशिव (प्रतिनिधी)- पावसाळा संपत असतानाच धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. वाढते तापमान, पाण्याचे बाष्पीभवन आणि खालावणारी भूजलपातळी यामुळे आगामी उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याच्या आणीबाणीचे परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवार दि. 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेस नितीन काळे, सतीश दंडनाईक, जि. प. चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, नगराध्यक्षा नेहा काकडे, युवराज नळे आदी उपस्थित होते.  पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये 11 ऑक्टोबर रोजी केवळ 6.44 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील दहा महिने उपलब्ध पाणी पुरवून वापरावे लागणार आहे. वाढत्या तापमानामुळे मागील 41 दिवसांत जलसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. धरणांत केवळ 6.44 टक्के पाणी असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची उपयुक्त पाणीसाठ्याची एकूण क्षमता सुमारे 725 दशलक्ष घनमीटर (दलघमी) आहे. 1 सप्टेंबर रोजी या प्रकल्पांमध्ये 59.6 दलघमी पाणी होते. मात्र, 11 ऑक्टोबरपर्यंत हा साठा घटून 46.75 दलघमीवर आला. म्हणजेच अवघ्या 41 दिवसांत 12.85 दलघमी पाणी कमी झाले आहे. सध्या एकूण क्षमतेच्या केवळ 6.44 टक्के पाणी शिल्लक असल्याने चिंता वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्याचे कमाल तापमान साधारणतः 30 ते 31 अंश सेल्सिअस असते. यंदा ते 34 ते 35 अंशांपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, उपलब्ध जलसाठ्यावर त्याचा ताण वाढत आहे. भूजलपातळीतही अपेक्षित सुधारणा झालेली नाही. 1 सप्टेंबर रोजी भूजलपातळीतील घसरण सहा मीटर होती. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ती 8.66 मीटरपर्यंत पोहोचल्याची असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे विहिरी आणि बोअरवेलमधील पाणी उपलब्धतेवरही परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.


2015 मध्ये अशीच परिस्थिती

सन 2015 मध्ये धाराशिव जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी जलसाठा 12 दलघमीपर्यंत घसरला होता. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी 468 टँकर सुरू करावे लागले होते. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. जे बांधकाम चालू आहेत ते बंद करावेत. पाण्याच्या बाबतीत कोणतेही राजकारण न करता सकारात्मक विचार करणे आवश्यक असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 


 
Top