तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी मातेच्या अश्विनी पौर्णिमा सोहळ्यासाठी तुळजाईनगरीत भाविकांचा जनसागर उसळला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांतून आलेल्या सुमारे लाखो भाविकांनी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला तुळजापूरमध्ये हजेरी लावली. ‘आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो'च्या जयघोषाने संपूर्ण तुळजापूर नगरी दुमदुमून गेली असून, सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पायी चालत आई तुळजाभवानीच्या चरणी अश्विनी पौर्णिमेची वारी अर्पण करण्यासाठी दाखल होत आहेत. ऊन, वारा, पाऊस आणि दुष्काळाच्या झळा सोसत, विविध हालअपेष्टांची पर्वा न करता सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष देवीच्या दर्शनासाठी .मार्गक्रमण करत आहेत. देवी नवसाला पावते, ..या दृढ श्रद्धेतून मुस्लिम बांधवांसह विविध समाजांतील भाविकही पायी वारीत सहभागी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
घाटशिळीचे दर्शन घेऊन तुळजापुरात प्रवेश
सोलापूरसह हैदराबाद, झहीराबाद, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, बार्शी, लातूर, नळदुर्ग आणि धाराशिव या मार्गांवरून भाविकांचे जत्थे तुळजापूरकडे मार्गक्रमण करत आहेत. तुळजापूरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी घाटशिळीचे दर्शन घेण्याची परंपरा अनेक भाविकांकडून पाळली जात आहे. पायी येणाऱ्या भाविकांमुळे शहरातील प्रमुख रस्ते, प्रवेशमार्ग आणि मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला आहे.
सेवाभावी संस्थांकडून भक्तांची सेवा
पायी वारी करून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुसह्य व्हावा, यासाठी विशाल अग्रवाल परिवाराच्यावतीने सांगवी मार्डी जवळ उभारण्यात आलेल्या अन्नछत्राचा लाभ लाखो भाविकांनी घेतला. ही सेवा अंखडीत 24 तास चालू असून या अन्नछत्राच्या व्यवस्थापनासाठी अग्रवाल परिवारातील विशाल अग्रवाल, राखी अग्रवाल, संजना अग्रवाल, विजय देवीचंद अग्रवाल, हर्ष कुलदीप अग्रवाल, मातोश्री पुष्पा देवीचंद अग्रवाल, दीपक खुशिराम अग्रवाल, अनिल पवनकुमार अग्रवाल, दिनेश भाई व तुळजापुरातील अग्रवाल परिवारातील सदस्य भक्तसेवेत योगदान देत आहेत. तेलंगाना राज्यातील जहाराबाद येथील माजी सैनिक हे गेल्या 29 वर्षापासून हे गेल्या 29 वर्षापासून नळदुर्ग रोडवर अन्नछत्र पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. लांबचा पायी प्रवास करून येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळत आहे.
सोमवारी धार्मिक विधींची सांगता
अश्विनी पौर्णिमेनिमित्त सोमवारी पहाटे मंचकी निद्रा घेत असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानंतर नित्योपचार पूजा व अन्य धार्मिक विधी पार पडतील. रात्री वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असलेला छबिना काढण्यात येणार आहे. यावेळी सोलापूरच्या काठ्यांसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. महंत वाकोजी बुवा व गुरु तुकोजी बुवा यांच्या परंपरेनुसार जोगवा मागण्याचा विधी पार पडल्यानंतर शारदीय नवरात्रोत्सवातील अश्विनी पौर्णिमेच्या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे.
मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तुळजापूर शहरासह मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर संस्थान, पुजारी मंडळ आणि यात्रा व्यवस्थेशी संबंधित विविध शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. भक्तांच्या प्रचंड गर्दीने तुळजाईनगरी अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाली असून, सर्वत्र ‘आई तुळजाभवानीचा उदो उदो' असा जयघोष घुमत आहे.



