धाराशिव (प्रतिनिधी)- विजयादशमी म्हणजे विजयाचा, मांगल्याचा आणि नव्या संकल्पांचा उत्सव! भारतीय संस्कृतीत दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन आणि आयुधपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, आयुधांचे स्वरूप बदलले; मात्र ज्ञानाचे सामर्थ्य आजही सर्वश्रेष्ठ आहे. याच विचाराला सर्जनशीलतेची आणि ज्ञानसंस्कृतीची जोड देत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘ज्ञानदुर्गां'नी यंदा विजयादशमीच्या निमित्ताने ग्रंथालयातील पुस्तकांचे पूजन करून आयुधपूजनाची एक अनोखी आणि प्रेरणादायी परंपरा जपली.
महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा.सुनीता गुंजाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध विभागांतील प्राध्यापिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ज्ञानाच्या मंदिरात ग्रंथांचे पूजन करताना परंपरेचा सन्मान आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
भारतीय संस्कृतीमध्ये दसऱ्याला शस्त्रपूजन करण्यामागे सामर्थ्य, कर्तव्य आणि विजय यांची भावना दडलेली आहे. आजच्या ज्ञानाधिष्ठित युगात पुस्तक हेच विचारांचे शस्त्र, ज्ञान हेच सामर्थ्य आणि शिक्षण हाच प्रगतीचा राजमार्ग आहे. या उदात्त विचाराचे प्रतीक म्हणून ग्रंथपूजनाचा हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. हातातील शस्त्रापेक्षा मनातील विचार अधिक सामर्थ्यवान असतात आणि अज्ञानावर विजय मिळविण्यासाठी ज्ञानाइतके प्रभावी आयुध दुसरे कोणतेही नाही, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले, “दसऱ्याच्या दिवशी आयुधपूजनाला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या काळात ज्ञान हेच आपले खरे आयुध आहे. हे ज्ञान आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून ग्रंथालयात मिळते. त्यामुळे आपल्या ‘ज्ञानदुर्गां'नी ग्रंथालयातील पुस्तकांचे पूजन करून आयुधपूजनाला एक वेगळे आणि अर्थपूर्ण स्वरूप दिले आहे. हा उपक्रम केवळ परंपरेचे पालन करणारा नसून ज्ञानाविषयी आदर, वाचनसंस्कृती आणि शैक्षणिक मूल्ये जपणारा आहे.”
कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा.सुनीता गुंजाळ यांनी या उपक्रमामागील संकल्पना विशद केली. त्या म्हणाल्या की, सण-उत्सव हे केवळ परंपरा जपण्याचे माध्यम नसून त्यांना वर्तमानाशी जोडून नवे अर्थ देण्याची संधी असते. विजयादशमीच्या निमित्ताने पुस्तकांचे पूजन करण्यामागे ज्ञानाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकाने ज्ञानसाधनेप्रती आपली बांधिलकी जपणे, हा उद्देश आहे.
या उपक्रमाला महाविद्यालयातील विविध विभागांतील प्राध्यापिका आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. पारंपरिक सणाला आधुनिक शैक्षणिक विचारांची जोड देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रमासाठी सहाय्यक ग्रंथपाल बिभीषण सिरसट, सविता नलावडे, सूक्ष्मा टेकाळे, संभाजी धत्तुरे, सुनीता कुंभार,अजमेर मुलानी यांनी विशेष सहकार्य केले.
