भूम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यातील सुकटा शिवारात पवनचक्कीच्या वादातून फायटरपंचने अडवून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याच्या गंभीर प्रकरणातील मुख्य फरार आरोपी सचिन ऊर्फ भैय्या बाबन जानकर यास भूम पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुकटा शिवारात पवनचक्कीच्या वादातून फिर्यादीस अडवून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी सचिन ऊर्फ भैय्या बाबन जानकर हा फरार होता. या प्रकरणाचा तपास भूम पोलिसांकडून सुरू होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पातळ्यांवर तपास केला. दरम्यान, आरोपी वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी लोणावळा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे भूम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनमोल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ पथक तयार केले. पथकाने लोणावळा येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला आणि त्यास अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध धाराशिव व पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भूम पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. फरार आरोपीला अटक केल्याने या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.


 
Top