भूम (प्रतिनिधी)- विद्युत तारांमधील शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ईट येथील सहा ते सात एकर ऊस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. 25) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत मोहन चव्हाण, गोरख चव्हाण आणि राजभाऊ केशव देशमुख यांच्या शेतातील ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे.
विद्युत खांबावरील तारांमधून शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्याने मोहन चव्हाण यांच्या उसाला सर्वप्रथम आग लागली. वाळलेल्या उसामुळे आणि वाऱ्याच्या झुळकीमुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता ही आग शेजारील गोरख चव्हाण यांच्या शेतात पसरली. त्यानंतर राजभाऊ केशव देशमुख यांच्या उसालाही आगीने आपल्या कवेत घेतले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील तरुण आणि शेतकरी मदतीसाठी धावून आले. ट्रॅक्टरच्या साहाय्याने उसामध्ये आडवे पट्टे तयार करून आगीचा फैलाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तरुणांच्या धाडसामुळे आणि सामूहिक प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा 200 ते 300 एकरांवरील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती होती.
विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ही आग लागल्याचा आरोप शेतकरी गोरख घनश्याम चव्हाण यांनी केला. चौकशीसाठी संबंधित कार्यालयात गेले असता कर्मचारी उपस्थित नसल्याचेही त्यांनी सांगितले. महसूल प्रशासन व महावितरणने तातडीने घटनास्थळी पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
