तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील आज पाचव्या माळेच्या दिवशी ललिता पंचमी निमित्त श्री तुळजाभवानी देवींची रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली.
धार्मिक आख्यायिकेनुसार भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री तुळजाभवानी मातेस दिला होता. त्या परंपरेतून आजही रथ अलंकार अवतार पूजेला विशेष महत्व आहे. बुधवार (14 ऑक्टोबर) रोजी चौथ्या माळेच्या दिवशी गरुड वाहनावरून श्री तुळजाभवानी देवींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. या छबीना मिरवणुकीला उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, पुजारी, सेवेकरी व भाविक उपस्थित होते.
