धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचा शारदीय नवरात्र महोत्सव 11 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील तळमजल्यावर आज सर्व सुरक्षा रक्षक तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार व सीपीआर देण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडल्यास तिची प्राथमिक तपासणी कशी करावी, श्वासोच्छवास बंद झाल्यास सीपीआर कशा पद्धतीने द्यावा, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने कोणती कार्यवाही करावी, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. हे मूलभूत जीवन आधार प्रशिक्षण डॉ. श्रीराम नरवडे व डॉ. विकास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात तुळजापूर येथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, या उद्देशाने सुरक्षा व स्वच्छता कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, ऋषिकेश पराडे, सहायक सुरक्षा निरीक्षक श्रीकांत पवार, ओम खुरुद, स्वच्छता निरीक्षक दयानंद जोगदंड, सुरक्षा पर्यवेक्षक अक्षय घुगे, अनिल लोखंडे, आनंद पाटील, राजेंद्र नरवडे, स्वप्नील इंडोरी तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

 
Top