तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात दर्शन व्यवस्थेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. मंदिर संस्थानने समान दर्शनाच्या नावाखाली सुरू केलेल्या व्यवस्थेत प्रत्यक्षात सर्वसामान्य भाविकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून, पैसे देऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांना तुलनेने कमी वेळेत दर्शन मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित भेदभावाविरोधात जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले असून, धर्मदर्शन रांगेतील पेड दर्शनाची व्यवस्था तात्काळ हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, नवरात्र महोत्सवापूर्वी समान दर्शनाच्या नावाखाली पेड दर्शनाची रांग धर्मदर्शनाच्या रांगेत समाविष्ट करण्यात आली होती. त्यावेळी सर्व भाविकांना समान न्याय देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे पैसे देऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांनाही सर्वसामान्य भाविकांप्रमाणेच दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागेल आणि मंदिर संस्थान समानतेचा आदर्श निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, नवरात्र महोत्सवातील सध्याच्या दर्शन व्यवस्थेमुळे या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.


300 आणि 1,000 रुपयांच्या दर्शन व्यवस्थेवर आक्षेप

निवेदनकर्त्याने आरोप केला आहे की, 300 रुपयांचे पेड दर्शन धर्मदर्शनाच्या रांगेतून दिले जात असताना, 1,000 रुपयांच्या दर्शन पासधारकांना चोपदार दरवाज्यातून दर्शनासाठी सोडले जात आहे. त्यामुळे समान दर्शनाच्या घोषणेचा नेमका अर्थ काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

पेड दर्शनाची रांग धर्मदर्शनाच्या रांगेत जोडल्यामुळे सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी लागणारा वेळ दोन ते तीन तासांनी वाढत असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दूरवरून आलेल्या भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनकर्त्याचे म्हणणे आहे.


आठ ते दहा तास प्रतीक्षा, तरीही दर्शनासाठी ओढाताण?

निवेदनात सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी आठ ते दहा तास लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तुलनेने 300 रुपयांचे पेड दर्शन घेणाऱ्या भाविकांना सुमारे एका तासात, तर 1,000 रुपयांच्या दर्शन पासधारकांना 15 ते 20 मिनिटांत दर्शन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याउलट, तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतरही सर्वसामान्य भाविकांना देवीचे व्यवस्थित दर्शन न देता गर्दीतून बाहेर काढले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात यंदा अपेक्षेइतकी गर्दी नसतानाही दर्शनासाठी इतका वेळ का लागत आहे, याचे स्पष्टीकरण मंदिर संस्थानने द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

 
Top