धाराशिव (प्रतिनिधी) - मराठवाडा पदवीधर मतदार संघामध्ये शिवसेनेचे उमेदवार दिलीप घुगे हे स्वतः वकील आहेत. त्यांना वकिल व पदवीधर यांच्या प्रश्नांची जाण आहे. इतर उमेदवार बांधकाम व्यावसायिक व संस्थानिक आहेत. त्यांनी या मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले. मात्र, त्यांना पदवीधर, वकिल आणि सुशिक्षित बेकार यांचे प्रश्न सोडविता आलेले नाहीत. त्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची जाण असलेल्या व सभागृहात मांडून ते प्रश्न सोडवून घेणाऱ्या चळवळीतील दिलीप घुगे यांना एक नंबरची पसंती देऊन मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत आणि निवडून आणावे, असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी दि.17 ऑक्टोबर रोजी केले. दरम्यान, महिला वकीलांना बसण्यासाठी स्वतंत्र सभागृह देण्यासाठी माझ्या विकास निधीतील आमदार निधी आचारसंहिता संपल्याच्या दुसऱ्या दिवशीच देणार असल्याचा ठाम शब्द त्यांनी दिला.
धाराशिव जिल्हा बार असोसिएशनच्या सभागृहात शिवसेना (ठाकरे) चे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार दिलीप घुगे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बारचे जिल्हाध्यक्ष ॲड खंडेराव चौरे, शिवसेना नेते सुनील ताकमोरे, जिल्हा सह संपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, संजय निंबाळकर, बारचे उपाध्यक्ष ॲड ननवरे, ॲड सारिका मुंडे-पाटील, ॲड मालवी उंबरे, ॲड नरेंद्र वाघोलीकर, शिक्षक सेनेचे पद्माकर इंगळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, हा मतदारसंघ पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी तयार केलेला आहे. मात्र, पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आजपर्यंतच्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी केलेले नाही. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देऊन संधी देण्याचे काम फक्त शिवसेनाच करते असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे सरकारने जशी लाडका भाऊ योजना सुरू केली, तशीच लाडका वकील योजना सुरू करण्यासह नवीन वकिलांसाठी स्कॉलरशिप सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी उमेदवार घुगे यांनी वकील व पदवीधर यांचे प्रश्न सभागृहात मांडून त्यांना निश्चितपणे न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन असे आश्वासन घुगे यांनी दिले. यावेळी मकरंद राजेनिंबाळकर, संजय निंबाळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड खंडेराव चौरे यांनी तर सूत्रसंचालन ॲड. संजय भोरे यांनी व उपस्थितांचे आभार ॲड नरेंद्र वाघोलीकर यांनी मानले. या कार्यक्रमास महिला व पुरुष विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कळंब व धाराशिव येथील अनेक कॉलेज,महाविद्यालय, शासकीय ऑफिसमध्ये भेटी देण्यात आलेल्या आहेत.
