धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी इटकुर येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी निवडणुकीतील आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत सहभागी होत डॉ.पाटील यांनी मतदान केले. प्रचारादरम्यान पदवीधर मतदारांशी साधलेला संवाद आणि त्यांच्या प्रश्नांवर मांडलेली भूमिका या पार्श्वभूमीवर आता मतदारांचा कौल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीच्या प्रचारात शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा, नोकरभरती आणि पदवीधरांच्या विविध प्रश्नांना स्थान मिळाले. डॉ. पाटील यांनीही आपल्या प्रचारातून या विषयांवर भर देत पदवीधरांशी संवाद साधला होता. दरम्यान, इटकुर येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर डॉ.पाटील यांनी विजयाबाबत आशावाद व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या डॉ.पाटील यांच्या भवितव्याचा निर्णय मतदारांच्या कौलातून स्पष्ट होणार आहे.


 
Top