उमरगा/मुरुम (प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्गावर येणेगूरजवळ बापूराव पाटील मित्र मंडळ व मुरूम शहर व्यापारी यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा ते कोजागरी पौर्णिमेदरम्यान तुळजापूरला दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी बुधवारपासून (दि.21) अन्नदान सुरू करण्यात आले आहे.
दरवर्षी नवरात्रोत्सवात शेजारील कर्नाटक, तेलंगणा राज्यातून तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या भाविकांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. राष्ट्रीय महामार्गावर येणेगूर गावाजवळ बापूराव पाटील मित्र मंडळ व मुरूम शहर व्यापारी यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदान करण्यात येत आहे. बुधवारी (दि.21) सायंकाळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा मुरूमचे नगराध्यक्ष बापुराव पाटील यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून अन्नदान सुरू करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, व्यंकट जाधव, बाबासाहेब बिराजदार, गोविंद पाटील, धनराज टिकांबरे, सुजित शेळके आदींची उपस्थिती होती. कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी शेजारच्या कर्नाटक, आंध्र, तेलंगणा राज्यातून पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. अशा भाविकांप्रती आदर व्यक्त करण्यासह त्यांना जेवण मिळावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
25 वर्षांपासूनची परंपरा, बापूराव पाटील मित्र मंडळाचा उपक्रम
बापुराव पाटील मित्र मंडळ व मुरूम शहर व्यापारी यांच्याकडून मागील 25 वर्षांपासून सुरू झालेली परंपरा आजतागायत अखंडपणे सुरू आहे. यासाठी बालाप्रसाद काबरा, उमेश कारभारी, विलास वाडीकर, दत्ता कुंभार आदी मंडळी दिवसरात्र पुढाकार घेतात. अन्नदानाच्या माध्यमातून याठिकाणी बुंदी, चपाती, ज्वारीची भाकरी, बटाट्याची पातळ भाजी, बेसन, भात असे पूर्ण जेवण देण्यात येते. मार्गावर ठिकठिकाणी केवळ भात वरण वाटप करण्यात येते. मात्र येथे पूर्ण जेवण देण्यात येत असल्याने याठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
शरण पाटील फाउंडेशन कडून थंड पाण्याची सोय, श्री माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी कडून औषधे वाटप
युवा नेते शरण पाटील यांच्या वतीने शरण पाटील फाउंडेशन कडून याठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या थंड पाण्याची सोय करण्यात आली होती. याबरोबरच श्री माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मशीच्या वतीने पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचाराची सोय करण्यात आली होती. यावेळी सर्दी, ताप, अंगदुखी यासह विविध आजारावर औषधे वाटप करण्यात आले.
